आमचे काका
आमचे आदरणीय आणि लाडके काका, आमच्या आयुष्यातल्या तुमच्या अगदी मोगऱ्या सारख्या सहवासाला पूर्णविराम लागून आज १५ दिवस झाले. अजूनही डोळ्या समोर तुमचा तो सदा हसमुख चेहरा, तुमची गोल टोपी, तो काळा चष्मा ज्याच्यात अगदी एखाद्या हिरो सारखे दिसायचे तुम्ही, हि छबी जशी घर करून बसलीये आमच्या डोळ्यांच्या ओल्या पापण्यात. कधी हि नं भेटलेल्या व्यक्ती ला, पहिल्याच भेटीत, अगदी काही क्षणांतच आपलंसं करून घेणे, आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वातून समोरच्याला पूर्णपणे हरपून टाकणे, हे तुमचे स्वभाव वैशिष्ट्य सारखे आमच्या मनात घिरट्या घालत आहेत. प्रत्येक वेळी डायलिसिस ला गेले कि कुठली डिश आज नाष्ट्या मध्ये खायची आहे हे येतानाच ठरवणार, मग ती वाडेश्वर चे थालीपीठ असुदे कि वैशाली ची spdp. पुण्यात आले कि पूना बोर्डिंग हाऊस चं तुमचं आवडतं ब्राह्मणी जेवण, मला नाही वाटत मला असं कधी ऐरवी खायला मिळालं असतं. शारीरिक तब्येत ही तेव्हाच बळकट असते जेव्हा आपण आतून खुश असतो, आपलं मन आनंदी असतं, आणि या सगळ्याची गुरुकिल्ली पण आपल्याच हातात असते हे मी तुमच्या कडे बघूनच शिकलेय. योगायोगाने उरुळीला किंवा कधी तुम्ही सिटीत आले कि तुम्हाला भेटण्याचा माझा अट्टहास हा तुमचा आमच्या वर असलेल्या निरंतर प्रेमाचा पुरावा नाही तर अजून काय आहे. समोरचं माणूस तरी काही काळाने हे क्षण विसरून जाईल पण तुमचं प्रेम ते तसंच राहणार. कधी हि तुम्हाला भेटलो कि खूप काळाने भेटतोय अशी भावना तुम्ही आमच्या मनात कधीच उत्पन्न होऊ दिली नाही. कबाब खावेसे वाटले म्हणून खास लखनऊ ला जाऊ, सिल्क च्या साड्या घ्यायच्या म्हणून साऊथ ला जाऊ, राजस्थान ला गेले कि बॅगेत मावणार नाही एवढी खरेदी करू, कुठे हि गेले तर तिघी बहिणी आणि काकूंच्या सोबतीने, अगदी मनमोकळेपणाने सभोवतालच्या सगळ्या प्रियजनांसाठी तेवढ्याच हौसेने काही नं काही न विसरता घेऊन येणे हे खरंच नाही हं जमत कुणाला. बिनकामाच्या माणसाला सुद्धा तुम्ही तेवढंच लावून धरलेलं कि जणू कोण अगदी जिवलग व्यक्ती च आहे तुमचा. दुसऱ्यांसाठी जगत जगत त्यात आपला आनंद कसा साधायचा, कोण कसंही वागलं बोललं तरी त्याला ओपणारा आदर सन्मान हा त्याला आपल्याकडून दिला गेलाच पाहिजे, बेधडकपणे आपल्या स्वप्नांची ओढ घेणे, कुठलं तीर्थस्थान असुदे कि जगाचा कोणता कोपरा, आपल्या भरारी ह्या आपल्यालाच घ्यायच्या असतात आणि त्या बिनधास्तपणे घेणे, अश्या तुमच्या असंख्य गोष्टी आमचे केवळ प्रेरणास्थान नसून आम्हाला आयुष्यात लाभलेला आशीर्वाद आहे. आता असं वाटतंय की अजूनही किती प्रसंग होते जेव्हा आपली भेट परत झाली असती, सोडला असता एक दिवस कंटाळा आणि गेलो असतो उरुळी फक्त तुम्हाला भेटायला, ही खंत काही केल्या मनातून जात नाही. पण मग परत तुमचा चेहरा डोळ्या समोर येतो आणि तुमची ती प्रेमळ स्माइल बघून स्वतः वर जास्ती वेळ होणारा कठोरपणा क्षणातच विरघळून जातो. तुम्ही काहीच काळजी करू नका काका, कारण तुमच्या मागे अगदी पदोपदी तुम्हीच आहात की काय अश्या काकू आहेत आणि सगळं जग जिंकून घेतील अशी आमची मैत्रीण प्राजक्ता, शिवानी आणि केतकी दीदी आहे. माणूस आपल्याला सोडून जातो, पण त्याचं व्यक्तिमत्त्व हे नेहमी आपल्या सोबत असतं याचं उदाहरण आहेत आपल्या यादव लेडीज.
![]() |
You will forever be cherished in our memories. |

Comments
Post a Comment